शृंगार कवितेचा ब्लॉगस्पॉट कविता भाग -२








शृंगार कवितेचा ब्लॉगस्पॉट कविता भाग -२













21.



 


तिची नथ बाई पुढ्याची,

चहा पिताना ती ओढायची.

 

मी मात्र गालात हसायची,

अन म्हणायची.

 

देईल काढून तुला नाकाची,

येता वर तुझा हाताशी.

 

मी मात्र लाजायची

अन तिच्या कुशीत

उगाच दडायची.

***

22.

शब्द न असती ओठावरती,
तरी भाव असे मनी.
शब्दच शब्दांना न पुरती
किमया कि ही जादुगरी....
***

23.
नकटीच्या लग्नाला सतरा विघ्नं

याची प्रचिती प्रवासाच्या सुरुवातीलाच अली.

लग्नाचा दिवस जातो भारी

पण ठरावतानाच स्थळांचीच मेजवानी सारी.।


पासपोर्ट हातात येईपर्यंत दमछाक झालेला खरा

अन डोंगर पोखरून उंदीर काढल्यागत

पी. सी. सी. अन व्हॅक्सीनेशन च्याच साऱ्या तऱ्हा।।


इमिंग्रेशनला कोंबडी आधी की अंड हाच वाद गेला फळा

अन कोंबडी नको अंड घेऊन आम्ही ठेपलों विमानघरा।।।


शोधत बसलो प्रवेशद्वार कळलं तेव्हा विमनातच पोहचलो पार.

सुरु झालं विमान अन गाठलं आम्ही अर्धं स्थान.

पापणी लवता जग बदललं अन माझं मलाच नाही उरलं भान।।।।


पावलो पावली बदलतंय पाणी अन बोली तेथे

प्रवासाचाअंतिम टप्पाही झाला गोड.

आपल्यासारखाच आपला परक्या मुलखातला माणूस पाहून दूर होते भीती

परक्या मुलखात ओळखीचा भेटेल का ओ कोण......।।।।।

                                            ***






24.



आपण रोज आरश्य्यात पाहतो

दिसतोही सुंदर स्वतःला

पण सांगायचं विसरतो

किती सुंदर ते...||१||

 

मग दाखवतो एखादा आरसा

पहातोही आपण त्यात स्वतःला

मग होतो कधी उदास,हताश,

निराश,भ्रमिस्ट उगाच...||२||

 

येतो मग आरसा पुन्हा भेटीला

पहातोही आपण पुनः पुनः स्वतःला

यावेळी नक्की सांगतो किती

सुंदर आहोत ते।।३।।

मग दाखवतो स्वतःला आरसा

पहातोही स्वतःला आपण त्यात

मग घेतो कधी उभारी, भरारी

गगनात आरपार...||४||
***

25.

मानवा, तुझीच किमया न्यारी,
उभारली सिमेंटची जंगलं सारी.
तहानली पशु-पक्षी प्यारी,
उध्वस्त,प्रदूषित दुनिया सारी.
***


26.

बांधा वरती आम्ही खड़े,
देऊ नका भावकीची तड़े.

ऊन ,वारा, सुख सावली,
पाऊस धारा शेत राखली.
***

27.

या फेसाळणाऱ्या लाटा 
येती भेटण्या तीरास.
सोडूनी शंख,शिंपले
वाळूकण नक्षी खास।।१।।

दिसे फक्त फेसलाट
कंप खोल तळात.
एक बाहिर मनात
दुजा अंतरी मनात।।२।।

होईल कधी त्सुनामी
कधी नुसते तरंग.
अठवांचे मोरपीस
ही फेसाळणारी लाट।।३।।
***

28.

प्रितीच्या रंगात तुझ्यासवे चालताना
वाटेत...
गुलाबाची काटे गळून पडली.
उचलून अलगद 
वाट फुलांची झाली।।१।।

प्रितीच्या रंगात तुझ्यासवे चालताना
सोबतीला...
उन्हाला- सावलीची, अंधाराला- उजेडाची,
पहाटेला किरणांची,
साथ सोबती झाली।।२।।

प्रितीच्या रंगात तुझ्यासवे चालताना
जीवनी...
बहर फुलांचा मोहरला,
रंगूनी प्रेम रंगी,
काव्यपंक्ति झाला।।३।।
***


29.

घरात एक वादळ घुसलं
त्याला बाहेर काढण्याच्या नादात
मीच रुतले खोल वादात
शांत झाले तेव्हा कळलं.
***

30.
कलियुग लागलंय बदलायला हो
    कलियुग लागलंय बदलायला।।धृ।।

आधी होते रॉकेलचे दिवे
आता आले लाईटचे दिवे
 लागलेत लुकलुक करायला हो।।१

आधी होते फेट्यावाले
नंतर आले टोपीवाले
लागलेत शायनिंग मारायला हो।।२।

आधी होत्या सायकलगाड्या
आता आल्यात मोटारगाड्या
लागल्यात हॉर्न वाजवायला हो।।३।।

आधी होत्या नववार साडया
आता आल्या सहावार साडया
लागल्यात वार धरायला हो
।।४।।

आधी होत्या कुंकवावाल्या
आता आल्यात टिकल्यावाल्या
लागल्यात भिंती रंगवायला हो।।५।

आधी होत्या सुगरण आया
आता आल्यात कामवाल्या बाया
लागल्यात पाणी पाजायला हो।।६।।

आधी होते चष्मयावाले
आता आलेत गॉगलवाले
लागलेत डोळे मिचकवायला हो।।७।।
***


31.

बापानं फी भरायला पैसे नसताना
चैन गहाण ठेवली अन ऐपत नसताना
पोर शिकवली.।।१।।

काही दिसानं लोकलज्जेखातर
वयात आलेली पोर उजवली
अन नावऱ्यानं तिला पुढं शिकवली.।।२।।

पण नशिबाने तिला 
वेगळीच गोष्ट शिकवली
बळीराजागत तिची गत
नोकरी शोधण्यात झाली.।।३।।

एक दिस पोर कमावती झाली
अन तीनं दोन्ही घर सजवली
एक माहेर अन दुसरं सासर
सांगा मग पोर जड कुठे झाली.।।४।।
           ***



                                 32.


शोधते मी कविता माझ्या
सापडेल का ओ कधी
हरवलेली वस्तु अचानक
भेटेल का व कधी.।।१।।

सगळे म्हणतात एडिसनच्या
दिव्यासाठी हजार दिवे निर्माण झाले
तश्या होतील का ओ परत परत
माझ्या कविता कधी.।।२।।

फुलपाखरासारख्या बहरल्या होत्या
कळी होण्याआधी.
फुलतील कि कोमेजतील 
ओ नाजुक फुलापरि.।।३।।

सगळे म्हणतात शोधलं की सापडतं
तश्या सापडेल ना कविता माझ्या
इतिहासातल्या खजिन्यापरि
कि पडतील आडगळीत सामानापरि.।।४।।
               ***


                                        33.

क्षण क्षणात विलीन होई
क्षण क्षणात होते नव्हतं.

वेचलेले कण-कण 
आयुष्य रंग-बेरंगी असतं.

गेले वाया तरी 
मोल मोलाचं नसतं.

फुकटात असलं तरी
जीव श्वासात असतं.

कीड़ा-मुंगीचं जगणं
प्रत्येकात असतं.

निजून-उठणं
आयुष्य नसतं.

भारलेलं गाठूडे प्रत्येक
शिंपल्यातला मोती नसतं.

हरवलेला क्षण तो एक
जीवनात असतो-नसतो.
                  ***



                                           34.

करुनि यतनांची रास
घडला अवघा महाराष्ट्र
संतांची भूमि महाराष्ट्र...।।१।।

मायेची हाक महाराष्ट्र
महासगरांचा मिलाप महाराष्ट्र
संस्कृतीची खाण महाराष्ट्र...।।२।।

गड-किल्ल्यांची साद महाराष्ट्र
भाषेतील एकता महाराष्ट्र
शिवरायांची भूमि महाराष्ट्र...।।३।।

समाजसुधारकांचं कार्य महाराष्ट्र
विद्येचे माहेरघर महाराष्ट्र
मराठी मना-मनात महाराष्ट्र...।।४।।

काळ्या-मातीत जन्माला महाराष्ट्र
नवरत्नांची खाण महाराष्ट्र
जय जयकार महाराष्ट्र।।५।।
                      ***

  

                                   35.

       प्रेम म्हणजे काय  असतं?
  शाळेतलं पहिल्या बाकावरुन उडून
  जाणारे पाखरु असतं.  
  बालपणातलं भतुकलीच्या खेळातलं
  डॉक्टर, टीचर असतं.
  कधी कॉलेजातलं तारुण्य असतं.।।१।।

  एकमेकांची एकमेकांना असणारी ओढ़ असतं.
  गावातून लग्न करून जाणारं अश्रु असतं.
  चौकातल्या कढ़ाईत डुम्बनारं बटाटा वडा असतं.
  तर कधी चहात पडणारी साखर असतं.।।२।।

  कधी दूर कधी जवळ असतं.
  चित्रपटातलं मोह, माया,काल्पनिक असतं.
  कसंही असलं तरी ते प्रेम असतं.।।३।।

  कधी त्याग असतं.
  कधी सोबत असतं.
  मनाने केलेली प्रार्थना असतं.
  समोरच्याने पळवलेलं काळीज
  असतं.।।४।।

  जीवनाचं गुपित असतं.
  निसर्गाने साधलेला डाव असतं.
  तुझी माझी साथ असतं.।।५।।

  आई-बापाचं गगनात भरारी घेणारे अग्निपंख असतं.
  नवरा-बायकोची संसारात तरणारी नाव असतं.
  म्हतारपणाची आधाराची काठी असतं.
  सोबतीच्या आठवाणीचा खजिना असतं.।।६।।
                                     ***
 

                                         36.     


सितेला रामासवे वनवास घडला,
माझाही माझ्यासवे प्रवास घडला.
आठवणीचा शिंपला हळूच उलगडला,
अश्रुंचा तेथे मोती घडला.
              ***


                                        37.
मुके आम्ही प्राणी
आम्हा नाही वाणी.

करू नका हानी
जंगल आमची रानी.

नदी आमचं पाणी
जीवन आमचं गाणी.

तुम्ही असता घरा
आमची होई तऱ्हा.

ऊन पाऊस वारा
आम्हा नाही थारा.

तोड़ू नका झाडे
त्यात आमची जाळे.....
       ***



                                     38.
जीवन एक फुटबॉल आहे
कोणीही यावं लाथ मारावी
कधी सरळ जावं
कधी खाली पडून उंच उडावं
गोल गाठण्यासाठी.।।१।।

कोणी येतं पीन मारतं
हवा जाते कायमची
फुगा फुटवा तसा 
अहंकारही फुटतो
उरतो फक्त जीव गेलेला रबर.।।२।।

पुन्हा नवीन फुटबॉल
पुन्हा नवीन खेळ
नवे ध्येय,नवी वेळ
उम्मेद पुन्हा उडण्याची
हळूच लाथ मारण्याची
उंच ध्येय गाठण्याची.।।३।।
        ***



                                            39.

हाऊसवाईफ एक वाईफ असते
तिची पण एक लाईफ असते.
कधी असते ती ट्रेनचा न थांबणारा डबा
तयार असतो तिचा नेहमी चारचा डबा.।।१।।

कधी असते शाळेतली बाई,ताई
आई तर कधी साऱ्या घराची दाई.
कधी म्हणत नाही तिला घरकाम थांब
कामावरही जायचं असतं लांब.।।२।।

कधी दिसते वाचताना पोथी
जपत असते नाती गोती.
कधी विणकाम कधी निवडकाम
अवडिने सवडिने जोपासते छंदकाम.।।३।।

या साऱ्यात घराला येतं घरपण
तीचं हरवत असतं बाईपण.
उगाच हाऊसवाईफ नसते काहीपण
ती असते म्हणून असतं घरपण.।।४।।
         ***



                                  40.




मैत्री असावी फुलापरि,
सुकूनही गंध दरवळणारी.

आठवण येता फुलणारी,
स्पर्श होता मिटणारी.

काजव्या परी चमचमणारी,
अंधाराला प्रकाशित करणारी.

आकाशापरि सामावून घेणारी,
पावसापरि मुक्त बरसणारी.

वाटसरूपरी कधी चुकणारी,
प्रवासाला शिदोरी उरणारी.

एक मैत्री असावी,
सदा ती जपावी.
     ***


                                              41.

एक अश्रू आठवांचा 

कैद रोज शिंपल्यात

ठाव मजला होईल

मोती द्याया तुला भेट.।।१।।


पाहशील तू मोतीच

अश्रु दडे सागरात

आठवांचा तो शिंपला

खोल दडला तळात.।।२।।

       ***



                                              42.

आत्याची आली मला तार
आत्या मला सुन करणार।।धृ।।

आत्याचा मुलगा काळा
जसा काय डांबराचा गोळा.

आत्याचा मुलगा लंबु
जसा काय लायटीचा खंबु.

आत्याचा मुलगा हेकना
पाहतोय नुसता चकणा.

आत्याचा मुलगा हिरो
गणितात पडतो झिरो.

आत्याचा मुलगा सायको
मी नाही त्याची बायको.
         ***


                                  43.

आसुरी भेटली मला अन सुर देऊन गेली
जाताना आई नाही मला अन अ,आ,इ,ई
शिकायचंय मला असंच काहीतरी सांगुन गेली.।।१।।

गजऱ्यात फुले माळताना बे एके बे अन
दुणे चारतून सुंदर माळ बनवायची ती
कधी विकताना पुस्तके हळूच एखादं
पान डोळे भरून न्याहालायची ती.।।२।।

बी.एम.सी. च्या स्कूलमध्ये होता घंटा
सुरु व्हायची तिची ट्रेनमध्ये पोटाची
खळगी भरणारी शाळा.
पण जिद्द तिची फार मोठी त्यापुढे
फिक्या पडतील सगळ्या शाळा.।।३।।

एक दिस ती नक्की शिकल शाळा
अन सुर भेटेल तिला नवा.
होता साक्षर ती सुरु होईल तिचा
सुरळीत जीवनाचा गाडा.
अशी आसुरी भेटली मला...।।४।।
                 ***



                                           44.

आयुष्य किती सुंदर आहे,
साधं सरळ सोपं आहे.
आपण रस्ता चुकत असतो,
ते मात्र सरळमार्गी असतं.
             ***


                                   45.
फुलायचं फळायचं बहरायचं झाड
रस्त्याच्या कडेला सजायचं झाड
ऊन वारा पाऊस झेलायचं
वाटसरूच्या विसाव्याला सावली पेरायचं.।।१।।

गावी गेल्यावर गोतावळा भरायचं
मोहरल्यावर अंब्यानी गच्च भरायचं
सावलीला आम्ही त्याच्या खेळायचं
मोठ्यांनी गोधडी टाकून घोरायचं.।।२।।

कोय कोणी लावली होती
माहित नवतं कोणाला काही
अडचण कशी झाली होती
कोणालाच कळलं कधीच नाही.।।३।।

सरपणाला चांगला होता भाव
एवढ्या एका कारणासाठी घाव
त्याच्यासवे आठवणीतला संपला गाव
हे त्याला कुठे ठाव.।।४।।
              ***


                                             46.

एके दिवशी अकरित घडलं,
फुलाने आपले नाव बदललं.
पाहता पाहता फुल फुललं,
सत्काराला जासवंदाचं गुलाब झालं.
          ***

         
                                   47.

मन हे असंच असतं
नको म्हणटलं की हवं असतं.

सोडलं की धरावं वाटतं
धरावं तर पळून जातं.

मागे पळावे तर लपून जातं
सोडावं तर हरवून जातं.

विसरावं तर स्वप्नात येतं
मोडवं तर तुटुन जातं.

जोडावं तर कधीच जोडता येत नाही
सांगावं तर सांगता येत नाही.

शब्दात गुंफावं तर शब्दही पुरत नाही
वेडं म्हणावं तर म्हणणाऱ्यालाही कळत नाही.

मन असंच असतं
कोणालाचं कळत नाही.
         ***


                                           48.



कसे जमले तुझे नि माझे
ऋणानुबंध हे जन्माचे
एक नाळ सोबतीला
गर्भी बीज अंकुरे
कुस ओलावली
हाक ही तुझी
सोबतीला
चाहूल
प्रीत
ही.।।१।।

बंध जुळले जन्माचे हेच
गाईचे अन वासराचे
पिलाचे अन पक्षाचे
आईचे न बाळाचे
मायेचे वात्सल्य
न फिटणारे
ऋण असे
जन्माचे
फळ
हे.।।२।।
  ***


                                   49.



 भारतीय संस्कृति 
देई धड़े.
सणा-वारांची
चाहूल घड़े.।।१।।

बहिणीला आणाया
भाऊराया मुरळी.
कालियाच्या माथी
कृष्ण मुरली.।।२।।

शुद्ध पंचमी
श्रावणमासी.
हर्ष वाटे
माय-माऊली.।।३।।

खेळ रचिला
सवे सखी.
फेर धरिला 
झिम्मा फुगड़ी.।।४।।

दही-लाहया
नैवद्य भाऊराया.
अळवी सखी
रक्षण कर बळीराया.।।५।।                
            ***

 

                                     50.




क्षण किती क्षणार्धात विलीन होतात,

क्षणाचाही विलंब न होता.

सुरुवातीला काहीच वाटलं नाही कारण

आठवणच आठवणीला सोबत होती.
।।१।।


दिवस उगवत होता 

तसा मावळत होता 

अन महिना सरत होता.।।२।।
मी तुझ्याजवळ येण्यासाठी 

धडपडत होते,

जीव कासावीस होत होत

श्वास गुदमरला होता.।।३।।



पण व्हेंटिलेटर लावावं त

 मी मला जिवंत ठेवलं होतं

फक्त तुला जपन्यासाठी,

फक्त तुला जपन्यासाठी.  
            ***


                                             51.


गर्भातुनी बीजाच्या कळीही फुलते,
आनंदाने मग झुलते डुलते.
टुटता नाळ जन्माची कळवळते,
कोमेजुनी मग निरोप घेते.
                  ***



              ★★★★★★समाप्त★★★★★★

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या