भेगाळलेल्या पायाची शोकांतिका सखारामच्या पायाच्या भेगा बोलत होत्या. पुनवाडी गावात सखाराम,त्याची बायको,चार मुली,एक मुलगा,सहा बहिणी,आई-वडील असे गरीब कुटुंब राहत होते.प्रामाणिक,कष्टाळू,मनमिळावू. कुठेही भेटला तर नमस्कार घालणार,खुशाली विचारणार असे सखारामचे व्यक्तीमत्व. घरातील एकटाच कर्ता पुरुष.वडील म्हातारपणाला टेकलेले. उपवर बहिणी,चार मुलींचे शिक्षण,आई-बायकोचे दुखणे,नुकताच जन्मलेला मुलगा,कर्जाचा डोंगर याच्या ओझ्याखाली सखाराम कुठेच नव्हता.त्यात दुष्काळाचा घाला.आता कुठे एका बहिणीचे लग्न जमले पण लग्न करायला पैसे कुठून आणणार.सावकाराकडून घ्यावे तर आधीचेच देणे. त्यात ना पाऊस न पाणी उत्पन्न कुठून येणार.
एक दिवस समूह विवाहाची योजना सरपंचाने सखारामला सांगितली.तुला फक्त बहिणींचे लग्न लावून दयायचे आहे.लग्नाचा सर्व खर्च या योजनेअंतर्गत केला जाईल.सखारामला थोडे ओझे कमी झाल्यासारखे वाटले. सहाही बहिणींचे एकाच वेळी लग्न झाले.तरी मागे अजून चार मुलींचे शिक्षण होतेच.
आता वडिलांचे छत्रही वृद्धापकाळाने हरवले.आईचे मोतिबिंदूचे ऑपरेशन झाले होते.सखाराम नव्या उमेदीने उठला.पावसाने थोडा आशेचा किरण दाखवला होता. शेतात नांगरणी पेरणी सुरू झाली.पीकही शेतात डोलू लागली.नेमका ऐन उमेदीत पिकाला बाजारभाव नाही.सखाराम पुन्हा उदास,हताश झाला.ना नफा ना तोटा या तत्वावर पीक निघून गेले.मुलींचे शिक्षण सरकारी शाळेत चालू होते.त्यात चारही मुली हुशार पण परिस्थितीने सखाराम खचून गेलेला.आता बायकोही शिवणकाम करून घर चालवत त्यामुळे संसाराला थोडा हातभार होता.
मुली शाळेत नाव काढत होत्या. मुलगाही मोठा होत होता.आता सखारामला वाटले मुलगा मोठा झाला शिकला सावरला की मी मोकळा. पण झाले उलटेच मुलगा शिकला,नोकरीही लागली.शहरात नोकरीच्या निमित्ताने गेला तर घरंच विसरून गेला.थोड्या दिवसांनी वडिलांना समजले त्याने प्रेमविवाह केला होता.काही दिवसांनी तो आपल्या पत्नीस घेऊन आई-वडिलांकडे आला.त्यांनीही सर्व विसरून सुनेला स्वीकारले. सर्व छान चालू होते.एक दिवस मुलाने अचानकच विचारले.बाबा आपल्याला किती जमीन आहे? आपण ती विकू आणि शहरात घर घेवू. बापाने मुलाचे धोरण ओळखले व मुलाला घराबाहेर काढले.आपण आजवर जगलेले सारे आयुष्य त्याच्या डोळ्यांपुढून सर्रकन निघून गेले. मुलाने कधी आपल्या बापाच्या पायाकडे पाहिलेच नव्हते त्याला फक्त बापंच दिसत होता.त्याचे कष्ट,स्वप्न मुलाच्या एका वाक्याने धुळीस मिळाली होती.
एकीकडे मुली,बहिणी त्याला आठवत होत्या. ज्यांना कधीच काही हौसेने करू दिले नव्हते.आणि दुसरीकडे हा वंशाचा दिवा मुलगा याला कधीच काही कमी पडू दिले नव्हते.जो आज बापालाच विकायला निघाला होता.ज्या काळ्या मातीत त्याने आपले संपूर्ण आयुष्य खर्चले. त्या मातीलाच आज पोरकं करायची भाषा करत होता.सखाराम मुलाच्या शब्दाने पूर्ण खचून गेला होता.आजवरच्या परिस्थितीने जेवढा खचला नव्हता तेवढा.सगळी मुले नसतीलही तशी पण आज आपल्या पोटी असा मुलगा जन्माला यावा या विचाराच्या गर्तेत अडकला होता.तो जमिनीवर कधी कोसळला आणि त्याला जमिनीने कधी आपलेसे केले त्याला कळलेच नाही.
इकडे मुलाला मात्र बाप गेल्यावर कळला.त्यासाठी त्याला स्वतः बाप बनावे लागले.ही खूप मोठी शोकांतिका आहे.बाप हा असाच असतो.कधीच कोणाला कळत नाही.तो कळतो तोपर्यंत तो उरत नाही.
***
★तात्पर्य:- बाप कळण्यासाठी बाप व्हावं लागतं ही शोकांतिका आहे.
सौ.स्वाती संदीप चौधरी.✍️
नवी मुंबई. ★★★★★
***टीप:- भेगाळलेल्या पायाची शोकांतिका ही अश्या कित्येक शेतकऱ्यांची व्यथा आहे.आपण निदान त्याच्याकडील पिकास एक चांगला भाव देऊन त्यांची व्यथा दूर करण्यात छोटासा हातभार लावू.विचार आवडल्यास coment करा.🙏🙏🙏***
***Story mirror वर ही कथा उपलब्ध आहे.त्याची लिंक खाली देत आहे.नक्की visit करा.🙏🙏🙏***
https://storymirror.com/read/marathi/story/bhegaallelyaa-paayaacii-shokaantikaa/wmty7719

1 टिप्पण्या